Home Breaking News चिखली तालुक्यातील बावन्न बुरुजी करवंड, इतिहास, परंपरा आणि एकोप्याचा लोकोत्सव .

चिखली तालुक्यातील बावन्न बुरुजी करवंड, इतिहास, परंपरा आणि एकोप्याचा लोकोत्सव .

177

बुलडाणा चौफेर मुख्यसंपादक : गंगाराम उबाळे 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेले करवंड हे गाव आपल्या समृद्ध इतिहासामुळे आणि सांस्कृतिक वारशामुळे विशेष ओळख निर्माण करून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून ओळख असलेल्या या गावाला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. महाराणी गुणवंताबाई इंगळे या महाराजांच्या आठव्या पत्नी होत आणि त्या करवंड गावच्या इंगळे घराण्यातील, स्वराज्याचे निष्ठावंत सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या होत. १५ एप्रिल १६५७ रोजी झालेल्या या विवाहाच्या स्मरणार्थ १५ एप्रिल २०२६ रोजी करवंड येथे भव्य ‘करवंड महोत्सव’ साजरा होत असून या ऐतिहासिक घटनेला तब्बल ३७० वर्षे पूर्ण होत आहेत.

या महोत्सवाच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्व. माधवराव बापू देशमुख आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छता करत इतिहासात नोंद केली आहे. गावकर्‍यांनी देखील हा उत्सव लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी एकजुटीने तयारी सुरू केली आहे. गावातील प्रत्येक घटक या कार्यात सहभागी होत असून स्वच्छता मोहिमेद्वारे परिसर सुशोभित करण्यात येत आहे.

करवंड हे गाव ‘बावन्न बुरुजी’ म्हणून प्रसिद्ध होते. पूर्वी संपूर्ण गावाभोवती ५२ बुरुजांचा मजबूत वेढा होता आणि येण्या-जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता होता. या बुरुजांच्या अगदी लगत सरदार शिवाजीराव इंगळे यांचा भव्य राजवाडा होता, जिथून आसपासच्या गावांचा कारभार पाहिला जात असे. आज त्या राजवाड्याचे अस्तित्व नामशेष झाले असले तरी एक भिंत अजूनही इतिहासाची साक्ष देत उभी आहे. बावन्न बुरुजांपैकी आज केवळ काहीच बुरुज शिल्लक असून ते गावाच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात.

पूर्वी गावातील घरे पांढर्‍या मातीची होती. बुरुजांच्या मातीचा उपयोग करून पक्की घरे बांधण्यात आली. त्यामुळे आजही काही प्रमाणात पांढर्‍या मातीची घरे पाहायला मिळतात. मात्र काळाच्या ओघात सिमेंट-विटांच्या घरांनी त्यांची जागा घेतली आहे. तरीही ‘पांढर्‍या मातीचं गाव’ ही ओळख आजही टिकून आहे.

गावातील सामाजिक एकोपाही तितकाच उल्लेखनीय आहे. अठरापगड जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. जातीभेदाला येथे स्थान नाही. सर्वजण एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, हीच गावाची खरी ताकद आहे.

बुरुजाजवळील मैदान पूर्वी क्रिकेट सामन्यांनी गजबजलेले असायचे. कालांतराने ते बंद झाले. जर त्या काळातील ज्येष्ठांनी या ऐतिहासिक वास्तूंची अधिक काळजी घेतली असती, तर आजही पूर्ण बुरुजांचा वेढा पाहायला मिळाला असता. तरीही तत्कालीन सरपंच जगन्नाथजी तारगे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे काही प्रमाणात हा वारसा जपला गेला. त्यांनी गावातील माती बाहेर नेण्यास बंदी घातली, ज्यामुळे उरलेले बुरुज आजही टिकून आहेत.

गावात बुरुजाजवळ एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराला बारा दरवाजे होते आणि बाजूला एक बारव (विहीर) होती, जिथून संपूर्ण गावाला पाणी पुरवले जात असे. आज ही वास्तू जीर्ण अवस्थेत आहे. जवळच कमलनाथ महादेवाचे प्राचीन मंदिर देखील आहे. या ठिकाणांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून त्यांचे जतन होणे आवश्यक आहे.

गावातील शिवप्रेमींनी आणि जागरूक नागरिकांनी या इतिहासाच्या जतनासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. निवेदनांद्वारे आणि लोकचळवळीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडण्यात आला आहे. त्याचेच फलित म्हणजे आज हा महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे.

करवंड हे केवळ एक गाव नाही, तर इतिहास, परंपरा आणि एकतेचे जिवंत उदाहरण आहे. १५ एप्रिल २०२६ हा दिवस गावाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाणार आहे. हा महोत्सव केवळ उत्सव नसून, आपल्या वारशाची जपणूक करण्याची एक प्रेरणा आहे.

 

 

 

इतिहासाला हाक देत करवंड येथील पुरातन वास्तू-

करवंड गावात एक पुरातन मंदिर/ समाधी/ स्तुपासारखी रचना असून हे नक्की काय असावं याबाबत पुरातत्व विभागाने माहिती घेण्याची आवश्यकता आहे. कारण कालौघात ही वास्तू नष्ट होऊ शकते. प्राचीन मंदिराचे हे भग्नावशेष शिखर वा स्तूपासारखे दिसतात.

वास्तविक पाहता अशा रचना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळून येतात. विशेषतः यादव काळात व त्यापूर्वीच्या काळात अशा प्रकारची रचना असायची. या वास्तुच्या बाजूला पूर्वी दोन पिंपळाची झाडे होती अशी माहिती येथील जाणकार देतात हे विशेष!