Home Breaking News जनगणना २०२७ साठी बुलढाण्याचा मान उंचावला; प्रा. संजय खडसे व डॉ. रामेश्वर...

जनगणना २०२७ साठी बुलढाण्याचा मान उंचावला; प्रा. संजय खडसे व डॉ. रामेश्वर पुरी राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर.

252

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा : गंगाराम उबाळे 

आगामी जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब घडली असून सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि खामगाव येथील उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांची महाराष्ट्र राज्यस्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून निवड करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वतीने जनगणना प्रक्रियेचे नियोजन, अंमलबजावणी आणि प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. त्यानुसार खडसे व पुरी यांनी नुकतेच पुणे येथील यशदा संस्थेमध्ये चार दिवसांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणामध्ये डिजिटल जनगणना प्रक्रिया, माहिती संकलन पद्धती, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच क्षेत्रीय अंमलबजावणी याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.

जिल्हास्तरावर दि. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत अधिकारी व फिल्ड मास्टर ट्रेनर्स यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर पुढील टप्प्यात तालुका स्तरावर प्रगणकांना मार्गदर्शन केले जाणार असून संपूर्ण यंत्रणा टप्प्याटप्प्याने सक्षम केली जाणार आहे.

जनगणना २०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिला टप्पा मे-जून महिन्यात होणार आहे. यंदा प्रथमच जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून करण्यात येणार असल्याने प्रशिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी यांची चार्ज ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

प्रा. संजय खडसे व डॉ. रामेश्वर पुरी हे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्ह्यात जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यासाठी ही निवड अभिमानास्पद मानली जात असून प्रशासनासह विविध स्तरांतून दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.