Home आपला जिल्हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तांदुळवाडी अंगणवाडीचा कायापालट; – रूम्हणा ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद पुढाकार.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तांदुळवाडी अंगणवाडीचा कायापालट; – रूम्हणा ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद पुढाकार.

95

बुलडाणा चौफेर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील रूम्हणा ग्रामपंचायतीने विकासकामांचा धडाका लावला आहे. या अभियानांतर्गत तांदुळवाडी येथील अंगणवाडी केंद्रात मूलभूत सुविधांचे बळकटीकरण करून हे केंद्र अधिक सक्षम करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या या यशस्वी वाटचालीची दखल आता थेट मंत्रालयाने घेतली असून, शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

रूम्हणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. विनोद सातपुते आणि ग्रामपंचायत सदस्य तथा भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. शिवराज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक मदत‌ गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि पेन यांचे वाटप.

शासकीय अभियान: ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘राष्ट्रीय पोषण अभियान’ यांची प्रभावी अंमलबजावणी ,सांस्कृतिक वारसा प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्साहात साजरी करून सामाजिक प्रबोधन.

पर्यावरण रक्षण: अंगणवाडी परिसरात नवीन बांधकाम करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर हरित करण्यात आला आहे.मंत्रालयातून उपक्रमांची दखल तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आलेल्या या सर्व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातून श्री. हरीश बावस्कर यांनी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी अंगणवाडीच्या कार्याची ‘ध्वनी चित्रफीत’ (व्हिडिओ) तयार केली. या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांची विशेष मुलाखत घेण्यात आली.

अंगणवाडी सेविका प्रिया खरात यांनी मुलाखतीद्वारे अंगणवाडीत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ही मुलाखत आणि विकासकामांचा व्हिडिओ ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. एका छोट्या गावातील अंगणवाडीचा आदर्श आता राज्यस्तरावर पोहोचल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त होत आहे.

“ग्रामविकासाचा ध्यास आणि लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचा योग्य समन्वय असेल तर गावाचा कायापालट निश्चित होतो, हे रूम्हणा ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे.”

या यशाबद्दल ग्रामविकास अधिकारी श्री. विनोद सातपुते, श्री. शिवराज कायंदे आणि अंगणवाडी सेविका प्रिया खरात यांचे सर्वस्तरातून कौतुक होत असून, तांदुळवाडी अंगणवाडी केंद्र हे इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.