Home आपला जिल्हा ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करताना सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे जेष्ठ पत्रकार भोजराज गाडेकर...

ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करताना सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे जेष्ठ पत्रकार भोजराज गाडेकर यांचे निधन.

168

बुलडाणा चौफेर न्युज:

सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद सारख्या छोट्याशा गावात जन्म घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य करणारे आणि १९८८ साली पत्रकार क्षेत्रात आपले कार्य करीत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी दाखविणारे आमचे मार्गदर्शक विदर्भ न्यायचे संपादक भोजराज नरहरी गाडेकर वय ६५ वर्ष यांचे दिर्घ आजाराने आज १३ सप्टेंबर रोजी निधन झाले .

भोजराज नरहरी गाडेकर यांनी १९८८ साली साखरखेर्डा येथे एक छोटेसे दुकान थाटून जनशक्ती हे वृत्तपत्र सुरू केले . सामना वृत्तपत्र , महासागर अशा वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले . सवडद येथील तेजराव देशमुख यांच्या सोबत काम करीत असताना ग्राम पंचायत सदस्य म्हणून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती योजना मंजूर करून घेण्यासाठी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला . संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून पाच वर्ष काम केले . त्यावेळी ग्रामीण भागात जाऊन ज्या महिलांना निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत त्यांचे अर्ज स्वतः आपल्या खिशाला कात्री लाऊन भरले . आणि योजनेचा लाभ मिळवून दिला . पत्रकारिता करीत असताना साप्ताहिक विदर्भ न्याय सुरु केले . साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक व राजकीय वारसा जोपासला . साखरखेर्डा तालुका निर्मिती करीता वसंतराव मगर यांच्या खांद्याला खांदा लावून तालुका निर्मिती आंदोलनात सहभागी झाले . रास्ता रोको असेल , बेमुदत उपोषण असेल , की मुंडण आंदोलन असेल भोजराज गाडेकर नेहमी आघाडीवर असायचे . ऍटो चालवित असताना सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन रुग्णांना चिखली , बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून मदत करीत असत . आपले संपूर्ण आयुष्य पत्रकारीता आणि समाजसेवेसाठी समर्पित करणारे हे व्यक्तीमत्व होते . त्यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ चिरंजीव संतोष गाडेकर हे साप्ताहिक विदर्भ न्यायचे काम पाहात आहेत . वडिलांच्या पश्चात समाज सेवेचं काम ते करीत आहे . आज सकाळी ११ वाजता सवडद येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले . यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती विषद केली . त्याच बरोबर कै . भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश गावंडे , माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे , पी एस आय गणेश डोईफोडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील , तेजराव देशमुख , पलसिध्द कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष साहेबराव काटे महाराज , बबनराव लोढे , बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक इंगळे , जिल्हा वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजेश टिकार , ठाणेदार गजानन करेवाड , साखरखेर्डा येथील सरपंच पती अमित जाधव , माजी उपसरपंच आयुब कुरेशी , सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक नागरे , माजी उपसरपंच इब्राहिम शहा , बुलढाणा जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष दामुआण्णा शिंगणे , बी सी चव्हाण सर , पत्रकार डी एन पांचाळ , पत्रकार प्रल्हाद देशमुख , पत्रकार भगवान साळवे , माजी केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यासह हजारो चाहता वर्ग उपस्थित होता . भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना संचालक पत्रकार सचिन खंडारे यांनी केले . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , एक मुलगी , दोन भाऊ असा मोठा परिवार आहे .

स्व . भोजराज नरहरी गाडेकर यांच्या अस्थी विसर्जन कार्यक्रम १५ सप्टेंबर रोज सोमवार सकाळी ९:३० वाजता सवडद येथे ठेवण्यात आला आहे .