बुलडाणा चौफेर न्युज
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्राम रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायवाटा व शेतरस्ते यांचे सीमांकन, अभिलेख अद्ययावत करणे व प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक (कोड) देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुक्यातील पहिल्या टप्यामध्ये ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), महसूल सेवक व पोलीस पाटील यांचेकडून स्थानिक नागरिकांसह नियोजन सभा घेण्यात आली आहे. गावातील सर्व रस्त्यांची, नकाशात दर्शविलेले तसेच नकाशात नसलेले परंतु वहिवाटीमध्ये असलेल्या रस्त्यांची पाहणी करुन माहिती प्रपत्र- १, प्रपत्र-२ मध्ये संकलीत करण्यात येणार आहे. तदनंतर 17 सप्टेंबर रोजी याबाबत ग्रामस्तरावर ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्या ग्रामसभेमध्ये शिवार फेरी मध्ये आढळले रस्त्यांचे, (प्रपत्र १ व प्रपत्र २) वाचन होईल व नागरीकांच्या रस्त्याबाबतच्या हरकती व दावे दाखल करून घेण्यात येतील. भूमी अभिलेख विभाग यांच्यामार्फत प्रपत्र १ व २ मधील रस्त्यांची सध्याची उपलब्धता आणि नकाशावरील त्यांची मूळ जागा विचारात घेऊन त्याबाबत मोजणी करुन सीमा चिन्हे स्थापित करण्यात येतील. १७ ते २२ सप्टेंबरदरम्यान गाव नकाशावर नसलेले व अतिक्रमीत रस्त्यांबाबत प्रत्यक्ष पाहणी, सुनावणी, निर्णय नोंदविणे तसेच उपलब्ध तरतुदीनुसार अतिक्रमण निष्कासन कार्यवाही पोलीस यंत्रणेमार्फत मदत घेऊन करण्यात येणार आहे. तसेच अद्ययावत अभिलेख, प्रपत्र ३ गाव नमुना १ फ मध्ये एकत्रित नोंदी घेण्यात येतील व रस्त्यांना प्रपत्र ४ प्रमाणे विशिष्ट क्रमांक देऊन व गाव दप्तरात नोंदी घेण्यात येतील. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकरिता तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले.
पाणंद रस्तेविषयक मोहीम
या मोहिमेत शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करुन ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक किंवा वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. यासाठी प्राथमिक स्वरुपात सिंदखेडराजा उपविभागातील काही गावे घेण्यात येणार असून, त्यातील काही रस्त्यांना संकेतांक क्रमांक देऊन सीमांकन पूर्ण करण्यात येणार आहे.
सर्वांसाठी घरे…
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने २३ ते २७ सप्टेंबरच्या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरीत्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात येईल. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करण्यात येतील. या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या, अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जातील.
स्थानिक गरजांनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम घेतले जातील.
मंडळ स्तरावर छत्रपती shivaji महाराज महाराजस्व अभियान राबवून नागरिकांना प्रमाणपत्र वाटप, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महसुली केसेस तडजोडीने सोडविण्यासाठी लोकअदालतींचे आयोजन करण्यात येईल. उपविभातील शासकीय जमिनीचा डाटाबेस तयार करणे आदी उपक्रम राबविण्यात येतील.






