Home आपला जिल्हा ताब्यातील शासकीय जमिनी नियमित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण! भारतीय समता संघटनेचे जिल्हाधिकारी...

ताब्यातील शासकीय जमिनी नियमित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण! भारतीय समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.

87

बुलडाणा चौफेर प्रतिनिधी : वृषाली उबाळे 

जिल्ह्यातील भूमिहीन, गरीब व शेतमजूर कुटुंबांच्या ताब्यात व वहीतीत असलेल्या शासकीय जमिनी नियमानुसार कायम पट्ट्याने देण्यात याव्यात, या मागणीसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

संघटनेचे अध्यक्ष आम्रपालभाऊ वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या धोरणानुसार सन 1978 ते 1991 पूर्वीपासून जिल्ह्यातील उपजीविकेचे कोणतेही साधन नसलेल्या, दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन, अनुसूचित जाती-जमाती तसेच भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांनी विनावापर पडीक असलेल्या शासनाच्या ई-क्लास व वनजमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविला आहे. अन्नधान्याची मूलभूत गरज भागविण्यासाठी अनेक वर्षांपासून ही जमीन कसली जात आहे.

मात्र या प्रश्नाबाबत अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा करूनही प्रशासनाने योग्य निर्णय घेतलेला नसून शेतकऱ्यांबाबत जनविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिणामी भूमिहीन शेतमजूर व वनजमीन कसणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.

सन 1991 ते 2010 या कालावधीत ताब्यात व वहीतीत असलेल्या शेतजमिनी नियमानुसार करण्यासाठी शासनाने स्पष्ट धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अनेक वर्षांपासून शासनाची जमीन कसणारा शेतकरी न्यायासाठी शासनाकडे धाव घेत असताना त्याला न्याय न मिळाल्यामुळे मोठा अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गरीब कुटुंबांच्या समस्या समजून घेऊन त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणात गुलाबभाऊ लांडगे, रतन शिंगणे, अर्जुन वायसे, अमोल भालेराव, सोपान खराटे, जयपाल वानखेडे, सतिष धुरंधर, दिलीप आडे आदी अतिक्रमणधारक सहभागी झाले आहेत.