Home आपला जिल्हा अंगणवाडी सेविका प्रियंका ताई खरात यांच्या पुढाकाराने तांदूळवाडी अंगणवाडी मध्ये माय मराठीचा...

अंगणवाडी सेविका प्रियंका ताई खरात यांच्या पुढाकाराने तांदूळवाडी अंगणवाडी मध्ये माय मराठीचा जागर.. : कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन.

120

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा : स्मिता उबाळे  

अक्षरांच्या लेण्यांनी नटलेली आपली मायमराठी आणि ‘विशाखा’कार कुसुमाग्रज यांच्या ओजस्वी शब्दांचा वारसा सांगणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ तांदुळवाडी (रुम्हणा) जांभोरा बिट सिंदखेडराजा प्रकल्प जिल्हा बुलढाणा येथील अंगणवाडी केंद्रात मोठ्या उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात मराठी भाषेच्या संवर्धनाचा जणू एक नवा संकल्पच सोडण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राध्यापक श्री. सुधाकर दत्तात्रय आढाव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक श्री. किसन नागोराव सरकटे यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी माजी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांच्यासह गावातील मान्यवर रुस्तुम आचलखांब, दरुबाई खरात, सुनीता खरात, जागृती काळे, प्रतीक काळे, पंकज काळे, कोहिनूर खरात आणि वेदिका नागरे यांची सन्माननीय उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात प्रा. सुधाकर आढाव यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करतानाच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्यांनी अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील तीन वर्षे शालेय साहित्य (पुस्तके, पेन, वह्या) मोफत पुरविण्याचे आश्वासन देऊन शिक्षणाप्रती आपली आत्मीयता व्यक्त केली.

तसेच प्रमुख पाहुणे किसन नागोराव सरकटे यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. कुसुमाग्रजांचे व्यक्तिमत्त्व आणि मराठी भाषेचा डौल त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मांडला, ज्यामुळे उपस्थितांना मायमराठीच्या समृद्धीची प्रचिती आली.”मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता आहे,” असा सूर या संपूर्ण सोहळ्यात उमटला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च विद्या विभुषीत अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तांदुळवाडी परिसरात या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आणि दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.