Home आपला जिल्हा मलकापूर पांग्रा महसूल मंडळ सिंदखेड राजा येथेच ठेवण्याची नागरिकांकडून मागणी;१ मार्चपासून आमरण...

मलकापूर पांग्रा महसूल मंडळ सिंदखेड राजा येथेच ठेवण्याची नागरिकांकडून मागणी;१ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा.

138

बुलडाणा चौफेर वृत्तसेवा :

सिंदखेड राजा तालुक्यातील ,

मलकापूर पांग्रा: महसूल मंडळाचा समावेश साखरखेर्डा अप्पर तहसील कार्यालयात न करता, साखरखेर्डा पूर्ण तालुका होईपर्यंत तो सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच कायम ठेवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना २४ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे. यापूर्वी सिंदखेड राजा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना सुद्धा ही निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मलकापूर पांग्रा मंडळातील १४ गावे ही साखरखेर्डा व सिंदखेडराजा यांच्या मधोमध आहेत. अप्पर तहसील कार्यालय, नायब तहसीलदार साखरखेर्डा येथून तहसीलची काही कामे साखरखेर्डा येथे पार पडली तरी तालुका दंडाधिकारी तहसीलदार, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, महावितरण कार्यालय, दिवाणी फौजदारी न्यायालय, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तालुका आरोग्य अधिकारी, आयसीडीएस, शिक्षण व इतर तालुकास्तरीय कार्यालयांसाठी नागरिकांना सिंदखेडराजा येथेच जावे लागणार आहे. त्यामुळे दुहेरी प्रवास करावा लागून वेळ व खर्च वाढणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

 

सध्या मलकापूर पांग्रा परिसरातील नागरिकांची विविध शासकीय कामे सिंदखेडराजा येथे एकाचवेळी पूर्ण होतात. मात्र साखरखेर्डा येथे सुरू होणारे अप्पर तहसील कार्यालय प्रारंभी वर्षानुवर्षे अपुऱ्या सुविधांसह कार्यरत राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय वाढेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

प्रशासकीय सोय, ऐतिहासिक भावनिक नाते तसेच बाजारपेठ आरोग्य शैक्षणिक इत्यादी सोयी सुविधांसाठी जालना देऊळगाव राजा छत्रपती संभाजीनगर येथे नेहमी जाणे येणे होत असल्याचे लक्षात घेऊन साखरखेर्डा पूर्ण तालुका म्हणून घोषित होईपर्यंत मलकापूर पांग्रा मंडळाचा समावेश सिंदखेडराजा तहसीलमध्येच ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी शासकीय दृष्टिकोनातून नागरिकांच्या सोयीसाठी न्याय व योग्य असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याबाबतील शासन आदेश पारित करावा अन्यथा १ मार्च २०२६ पासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अँड. लुकमान शेख, शरद साळवे, डॉ दिनकर सोनुने माजी सरपंच वगळा, परमेश्वर खंदारे सरपंच कोण आहे, राजेश इंगळे सरपंच कुंबेफळ, अशोकराव कायंदे सरपंच सरपंच देऊळगाव कोळ, नितीन पवार सरपंच ढोरवी, राजू गायकवाड माझे सरपंच जळगाव कोड, अशोक वाघ सरपंच झोटिंगा, पार्वती यादव टाले सरपंच मलकापूर पांगरा, गीता संतोष घाडगे सरपंच पोपळ शिवनी, रंजना विष्णू काकड सरपंच वाघाळा, कैलास साळवे, विठ्ठल मांजरे, सुभाष देशमुख, बाळू पवार, विजय सोनुने, गणेश डीघोळे, ज्ञानेश्वर वायाळ, यांच्यासह परिसरातील १४ गावातील सरपंच व नागरिक यांनी निवेदनद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे केली आहे.