मेरा बुद्रुक स्मशानभूमीत साजरा झाला आनंदाचा सोहळा !
आणि मेरा बुद्रुक स्मशानभूमीत झाली फटाक्याची आतिषबाजी
बुलडाणा चौफेर प्रतिनिधी : चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील सार्वजनिक स्मशान भूमी कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.स्मशानभूमी म्हटले की, लोकांच्या डोळ्यापुढे येथे ती प्रेत यात्रा,प्रचंड जनसमुदाय,स्मशानभूमीतील पडकं शेड,स्मशान शांतता ,आक्रोश मात्र मेरा बुद्रुक येथील सार्वजनिक स्मशानात आता चक्क वाढदिवस साजरे होत आहे.हे नवलच! जसे जग बदलत चालले आहे तशाच सर्व गोष्टी बदलत चालल्या आहेत.हे आपण पाहत आहोत,अनुभवत आहोत आणि स्वीकारत सुद्धा आहोत.आताच्या वाढदिवसाच्या सुरुवातीला वाढदिवस हे ठराविक मर्यादित साजरी केली जायचे मात्र ,आता वाढदिवसाचे फॅड झाले आहे असेच आपण म्हणतो. वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव ,मज्जा आणि धमाल नव्हे.हा दिवस असतो स्वतःला तपासून घेण्याचा, समाजसापेक्ष कृतीचा,याच भावनेतून पत्रकार सुनिल अंभोरे यांनी स्वतःचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा केला. पत्रकार सुनिल अंभोरे हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम करून सामाजिक चळवळीमध्ये त्यांचे योगदान आहे. आतापर्यंत त्यांना समाजरत्न, जीवनगौरव , समाज भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आपल्या समाजात वाढलेली अंधश्रद्धा दूर लोटण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपला वाढदिवस साजरा करण्याचा पत्रकार सुनिल अंभोरे यांचा मानस होता.मृत्यू हा अटळ आहे,किंबहुना अंतिम सत्य तेच आहे.त्या सत्याचा मिलाप होतो तो स्मशानभूमीतच.मग ती जागा अशुभ कशी? स्मशानभूमी बाबतचे गैरसमज अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सुनिल अंभोरे यांनी वाढदिवस स्मशानभूमीत हा आगळावेगळा उपक्रम राबविला आहे.सध्याच्या घडामोडीत वाढदिवसाला तरुण,तरुणी रस्त्यावर केक कापून मौज,मजा करताना दिसतात.पण पत्रकार सुनिल अंभोरे यांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा केला.लोक स्मशानभूमीत यायला भीत असतात. पण ही पवित्र जागा आहे,इथे सर्वांनाच यायचे आहे. स्मशानभूमीत कोणाचाही भेदभाव नाही श्रीमंत असो किंवा गरीब कुठल्याही जाती धर्माचा इथे जातिवाद नाही शेवटी सर्वांना याच जागी यायचे आहे.म्हणून मी सरकारी सार्वजनिक स्मशानभूमी येथे वाढदिवस साजरा केला श्रद्धा ठेवा मात्र अंधश्रद्धा नको हा संदेश पत्रकार सुनील अंभोरे यांनी यातून दिला आहे. स्मशानभूमीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती. पत्रकार सुनिल अंभोरे यांना काहींनी पुस्तके भेट दिली, काहींनी शाल, श्रीफळ, पुष्प, पुष्पहार, रुमाल टोपी, केक, पेढे भरविले. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याने सुद्धा स्मशानभूमीतच अल्पोपहार केला. स्मशानभूमीत आज पहिल्यांदाच फटाक्याची आतिषबाजी झाली, रंगांची उधळण ,पुष्पाचा वर्षाव आनंदाच्या क्षणी झाला. पहिल्या वेळेस टाळ्यांचा कडकडाट, पहिल्याच वेळेस गदागदा असणारे प्रसन्न चेहरे स्मशानभूमीने पाहिले. डोक्यातून काही प्रमाणात अंधश्रद्धा नक्कीच निघून गेली.

मृत्यू हा सत्य आहे आणि तो स्वीकारावेच लागेल एक ना एक दिवस त्याला समोर जावेच लागेल हे जर मान्य केले तर जीवन आनंदात जगू शकतो हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. या स्मशानभूमीतील आगळ्यावेगळ्या वाढदिवसाला गावातील नागरिकासह, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार मंडळी, नवयुवक तरुण यांचा सहभाग होता.स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करून ज्या मागे समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा आणि मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे याची जाणीव करण्याचा उद्देश मी सार्थ केला.स्मशानभूमी हे मृत्यूचे अंतिम सत्य दर्शविते त्यामुळे या ठिकाणी मी माझा वाढदिवस साजरा केला आणि एक छोटासा प्रयत्न अंधश्रद्धा दूर करण्याचा केला.






