Home Breaking News हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दुहेरी लढतीचे चित्र कोहळीकर, जवळगावकर समोरासमोर

हदगाव हिमायतनगर मतदारसंघात दुहेरी लढतीचे चित्र कोहळीकर, जवळगावकर समोरासमोर

257

नागोराव शिंदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर

हिमायतनगर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक सध्या रंगतदार अवस्थेत आलेली असून येथून महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर तर काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. माधवराव पाटील जवळगावकर या दोन उमेदवारांमध्ये समोरासमोर लढत होण्याची शक्यता दिसत असल्याने या लढतीकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

हदगाव हिमायतनगर मतदारसंघातून २००९ मध्ये मतदारांनी पहिल्यांदा माधवराव पाटील जवळगावकर यांना आमदार केले.त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांना मतदारांनी आमदार करत जवळगावकरांना दूर केले. त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत जवळगावकरांवर मतदारांनी विश्वास टाकला. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना मिळाले होती. आता या निवडणुकीत कोहळीकर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघातील हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे यावेळी बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पाठीशी राहिल्याने जवळगावकरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हदगाव मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप राठोड, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधव देवसरकर यांनीही या निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न चालविला असल्यामुळे होणाऱ्या मतविभागणीचा फटका कोणाला बसणार हे येत्या २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.