Home Breaking News तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ‘आरंभिक बालसंगोपन व शिक्षण’ दिन उत्साहात संपन्न… ...

तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात ‘आरंभिक बालसंगोपन व शिक्षण’ दिन उत्साहात संपन्न… बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी घेतली शिक्षणाची शपथ!

93

बुलडाणा चौफेर :  सिंदखेड राजा प्रतिनिधी

बालपण हा आयुष्याचा पाया असतो आणि या पायाला संस्कारांची व शिक्षणाची जोड मिळाली, तर भविष्यातील पिढी सशक्त घडते. हाच उदात्त हेतू समोर ठेवून सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा बीड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांदुळवाडी अंगणवाडी केंद्रात आज, १० मार्च २०२६ रोजी ‘आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस’ (ECCE DAY) मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘शिक्षण प्रतिज्ञा’. शासनाच्या धोरणानुसार, गावातील एकही बालक अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये, या संकल्पनेवर आधारित प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई, उपस्थित सर्व पालक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत भारावलेल्या अंतःकरणाने शिक्षणाची ही शपथ घेतली. “आमचे गाव, शंभर टक्के साक्षर गाव” हा मंत्र यावेळी जणू तांदुळवाडीच्या वातावरणात निनादला.समुदायासोबत शाळेची तयारी (School Readiness Campaign)

केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी ‘School Readiness Campaign with Community’ हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून शालेय शिस्तीच्या नियमांचे वाचन केले. शिक्षणाची प्रक्रिया ही केवळ चार भिंतींच्या आतली नसून ती समाजाच्या सहभागातून घडते, याचे उत्तम दर्शन या उपक्रमातून घडले.

या दिनाचे औचित्य साधून नवीन वर्षाची नाव नोंदणी आणि दीक्षांत सोहळाही पार पडला.अंगणवाडीतून प्राथमिक शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात आणि मदतनीस यांनी मुलांचे स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

“बालकांचे संगोपन ही केवळ पालकांची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची बांधिलकी आहे. आजच्या या उपक्रमातून पालकांमध्ये झालेली जागृती ही उद्याच्या प्रगत महाराष्ट्राची नांदी ठरेल.”या कार्यक्रमासाठी तांदुळवाडीतील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.