Home Breaking News मेरा बुद्रुक येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या पिकाला आग! शेतकऱ्यांच्या समय सूचकतेमुळे मोठा...

मेरा बुद्रुक येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या पिकाला आग! शेतकऱ्यांच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला..

2234

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी 

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील पिंपळगाव सोनारा रोड जवळील गोटी शिवार भाग एक मधील मदन पडघान यांच्या शेतामध्ये किशोर पडघान यांनी चार एकर गहू पेरला होता. दिनांक 9 मार्च 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता शेतामधील बेहड्याच्या झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारेचे झाडाच्या फांद्यामुळे एकमेकाला घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटमुळे आगीच्या ठिणग्या गव्हामध्ये पडल्या त्यामुळे गव्हाच्या पिकाने पेट घेतला. सदर बाब शेजारी असलेले प्रवीण पडघान, हर्षल पडघान ,जय पडघान ,कल्पनाताई पडघान यांच्या लक्षात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून समय सूचकता दाखवत त्यांनी आग लागलेल्या गव्हाच्या दिशेने धाव घेतली व आरडाओरडा सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी, आजूबाजूच्या शेतामधील लोकांनी आगीच्या दिशेने धाव घेऊन हातामध्ये लहान झाडाच्या फांद्या घेऊन जिवाची पर्वा न करता आग विझवायला सुरुवात केली. ही खबर वाऱ्यासारखी गावामध्ये पोहचली त्यामुळे गावातील लोकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे गाव घेतली. या आगीमध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये गहू पेरणाऱ्या शेतकऱ्याचे किशोर पडघान यांचे दहा ते पंधरा गुंठ्यामधील गव्हाच्या पिकाचे जळून नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे डीपीवरील डिओ पडून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतकऱ्यांनी तत्परता दाखवत परत विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करून विहिरीवरील मोटर चालू करून आग विझवण्यासाठी पाण्याची मदत घेतली. झाडाच्या फांद्याने आणि पाण्याने अखेर जाबाज शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र उन्हाचा तडाका बसत असल्यामुळे वाढलेले तापमान आगीला पोषक ठरते. ज्या शेतामधील गव्हाच्या शेताला आग लागली होती त्याच्या चारही बाजूला कमीत कमी 25 ते 30 एकराचा सलग गव्हाच्या पिकाचा पट्टा होता. शेतकऱ्यांनी समय सुचता दाखवत जीवाची परवा न करता जर आग आटोक्यात आणली नसती तर आज मोठा अनर्थ घडला असता. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महावितरण कंपनीने अगोदरच जर विद्युत तारे जवळील झाडाच्या फांद्या छाटल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. वर्षभर मेहनत, खर्च करून ऐन शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये पिकाचा घास आल्यानंतर अशा जर घटना घडत असतील त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास हिसकावून जात असेल तर यासारखे दुर्दैव कोणतेही नाही. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने याकडे लक्ष घालावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. उन्हामध्ये गव्हाच्या पिकाची आग विझवताना शेतकऱ्याला ईजा होऊन कदाचित जीवित हानीही झाली असती. आगीमुळे पिकाचा धोका लक्षात घेता त्याच दिवशी दुपारी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर आणून ओलाकाचा अर्धवट वाळलेला गहू काढून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नक्कीच काही प्रमाणाततेही पिकाचे नुकसान झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता किशोर पडघान, जय पडघान, प्रवीण पडघान, हर्षल पडघान, रामदास पडघान, अजय पडघान, सचिन पडघान, कल्पना पडघान, अन्सार पटेल, अक्रम पटेल, सचिन डोंगरदिवे, पंकज पडघान, मदन पडघान,जय पडघान, या सोबतच आणखीन 50 ते 60 या जाबाज शेतकऱ्यांनी मदत केली. यांच्या प्रयत्नामुळेच होणारा मोठा अनर्थ टळला. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनाही सावधान राहणे गरजेचे आहे. आता तरी महावितरण कंपनीने लाईनच्या दुरुस्तीकडे देखभाल करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.