Home Breaking News बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव...

बुलढाणा येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन.

191

बुलडाणा चौफेर : सुनिल अंभोरे प्रतिनिधी‌ 

बचत गटाच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी, गटांद्वारे उत्पादित मालांना चांगला भाव मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बचत गटांच्या वस्तू केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित न राहता त्या बाराही महिने ग्राहकांसाठी उपलब्ध राहिल्या पाहिजेत. यासाठी आठवडी बाजार, विविध महोत्सव, शिबिरे तसेच बचत गटांसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.जिल्हा ग्राम विकास यंत्रणा,कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडूरंग कोल्हे, ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की, महिलांमध्ये कौशल्य आणि सुप्त गुण मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र त्यांना योग्य संधी मिळत नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांना आपली कला आणि उत्पादने सादर करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्या संधीचे सोनं करावे. बचत गटांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यावर भर देणे गरजेचे असून बँकांनीही महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सीएलएफ (CLF) निधी पूर्वी ६० हजार रुपये इतका मर्यादित होता; मात्र केंद्र सरकारने त्यास वाढ देत तो आता दीड लाख रुपयांपर्यंत मंजूर केला आहे. या वाढीव निधीचा बचत गटांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांनी कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत सक्रिय सहभाग घ्यावा. त्यामुळे त्यांना कुटुंबात आणि समाजात मान-सन्मान मिळेल. प्रत्येक महिलांनी पुढे येऊन काम करण्याचे धाडस दाखवावे. ‘लखपती दीदी’ इतक्यावर न थांबता ‘करोडपती दीदी’ होण्याचा संकल्प महिलांनी करावा असे यावेळी ते म्हणाले. हे विक्री प्रदर्शन 9 मार्चपर्यंत राहील.