Home आपला जिल्हा पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सातेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर सत्कार.

पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सातेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर सत्कार.

33

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा विद्यार्थी ठरला यशाचा आदर्श; सातेगावात उत्साहाचे वातावरण; गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव

बुलडाणा चौफेर : अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) 

सातेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्याने महाराष्ट्र पोलीस दलात अकोला ग्रामीण येथे निवड मिळविल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य व जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २८ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

१४ एप्रिल २०२५ रोजी स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राने अवघ्या एका वर्षात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभ्यासिकेतील विद्यार्थी सय्यद फहीम सय्यद हुसेन यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने सातेगाव ग्रामपंचायत तसेच संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

अभ्यासिका यशस्वीपणे चालवण्यासाठी सरपंच छायाताई राजेंद्र वानखडे व भानुदास वानखडे यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सत्कार समारंभास सातेगावच्या सरपंच छायाताई राजेंद्र वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच पुरुषोत्तम काळे, ग्रामपंचायत सदस्य संजय हाडोळे, कपील देशमुख, अतुल काळे, संजय गावंडे, बाळा गावंडे, अर्चना संजय गावंडे,राजेंद्र वानखडे, श्याम इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामविकास अधिकारी जगदीश गावंडे, आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा अभ्यासिका केंद्रांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या केंद्रातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत स्थान मिळवतील, असा विश्वास राजेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केला. सय्यद फहीम यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, त्यांच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

गावकऱ्यांनीही या यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास वानखडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी तेजस्विनी सुभाष निर्मळ यांनी मानले.