Home आपला जिल्हा सिंदखेड राजा येथे लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली.

सिंदखेड राजा येथे लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली.

199

बुलडाणा चौफेर : गंगाराम उबाळे

सिंदखेड राजा येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत मलकापूर पांगरा व परिसरातील अनेक प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवण्यात आली. त्यामुळे संबंधित पक्षांना जलद व सुलभ न्याय मिळण्यास मदत झाली.

लोकअदालत ही न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळून परस्पर समन्वयातून व तडजोडीच्या मार्गाने वाद मिटवण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. या लोकअदालतीच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रकरणांवर तोडगा निघाल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या लोक अदालतीमध्ये मलकापूर पांग्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक व एडवोकेट ऋषी आटोळे यांनी गाव स्तरावर पुढाकार घेऊन जास्तीत जास्त प्रकरण आपसात मिटवण्यासाठी प्रयत्न केले.

या प्रसंगी सिंदखेड राजा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश रामराजे मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रभारी वकील ऋषिकेश आटोळे, आरीफ मलिक, तंटामुक्ती अध्यक्ष, एसबीआय शाखा व्यवस्थापक, तसेच अमोल देशमुख आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकरणांवर आपसी चर्चेद्वारे तडजोड करण्यात आली. यामुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांना जलद न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातही अशा उपक्रमांमुळे नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सोपे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.